कोकणकड्यावरचा सूर्यास्त



तसं बघितलं तर सह्याद्री मध्ये कुठूनही सूर्योदय अथवा सूर्यास्त बघा , तो आपल्याला मंत्रमुग्धच करतो . जर तो राजगडावरून बघत असू तर महाराजांनी तोरणा कसा जिंकला हे उलगडून सांगतो .. राजगडाचा च सूर्योदय पुरंदरावर धरातीर्थी पडलेल्या मुरारबाजींची आठवण करून देतो ....महाराजांच्या आग्रा प्रवासाची सुरवात याचं दिशेने झाली ....मिर्झाराजांच्या छावणीत बादशहा चं फर्मान आणी त्याला समोरे गेलेले महाराज आणी शंभु राजे .... असे अनेक किल्यांवरचे अनेक सूर्योदय आणी सूर्यास्त अनेक आठवणी जाग्या करतात....
 ...मोहरीच्या पठारावरून रायगडामागे जाणारा सूर्य तर डोळ्यात पाणी आणतो , कारण याचं रायगडावर आपल्याला तारणाऱ्या सूर्याचा अस्त झाला होता नं .... 
पण हरिश्चंद्राच्या कोकणकड्यावरून सूर्यास्त बघणे म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे ...मनात प्रचंड उलथापालथ करून  क्षणात शांत करणारा ...  प्रचंड खळबळ माजवून झटक्यात निसर्गाशी आणी त्या विधात्याशी जोडणारा इथला सूर्यास्त आहे . 
सूर्यास्ताची वेळ जसजशी जवळ येते तसतसा कोकणकडा अंग झटकून उभा राहायला सुरवात करतो ....मधेच भन्नाट वाहणारा वारा सुद्धा पूर्णपणे स्तब्ध होतो ..मधेच सोसाट्याने पुन्हा सुरु होतो ... तो भयावह कोकणकडा रूप बदलत असतो ... रंग बदलत असतो .... आपल्याला भास होत असतो की अचानक दरी मधून निसर्ग देवता जोरात म्हणेल " रंगदेवता आणी रसिक भटक्यांचं विनम्र अभिवादन स्वीकारून " .....

दिनकरराव जसं जसं क्षितिज जवळ करायला सुरवात करतात ..कड्याच्या एका बाजूने कड्याच्या पोटात एक पात्र विंगेतून आगमन करत ... "छाया " .... आणी दुसऱ्या बाजूने कड्याचा जो भाग अंतर्वक्र होऊन आत घुसलाय तिथे " प्रकाश " तिला कवेत घ्यायला असुसलाय .... छाया लाडिक फटका मारून म्हणत्ये आहे ... अंह ...नाही ... आता माझी पाळी आहे प्रकाशराव .... सकाळी तुम्ही कवेत घेऊन अंध:कार दूर करता ....आता दिवसभर काम करून थकला असाल ...आता माझ्या कुशीत निवांत आराम करा .... कड्यात लाईटमन क्षणाक्षणाला वातावरण रोमँटिक करतोय आणी क्षितिज जवळ करतोय .... खाली कोकण अंधुक होत चाललंय ...मागे तारामती पदर सावरून दिवेलागणी ची तयारी करते आहे .... माळशेज घाटात लुकलूक सुरु झालीये आणी क्षितिजावर नारंगी रंगाची मनसोक्त उधळण सुरु आहे .... 

हा सूर्यास्त आपल्याला निसर्गाशी एकरूप करतो बरं का .... सगळं मळभ दूर करून टाकतो एका क्षणात ....

Comments

Popular posts from this blog

सह्याद्रीच्या पोटात .... व्हाया घोणदांड घाट