सह्याद्रीच्या पोटात .... व्हाया घोणदांड घाट
बऱ्याच दिवसात अंगातली रग जिरवणारा , ताकदीची चाचणी घेणारा आणि पुन्हा पुन्हा सह्य पर्वतांच्या प्रेमात आकंठ बुडवणारा ट्रेक झाला नव्हता ... मनात कुठेतरी सतत रुखरुख होती .. हरिश्चंद्र सुद्धा पाचनई कडून च केला होता ..लोहगडी सुद्धा घोडा अगदी पायऱ्यां पर्यंत खेचला होता .... चिटूर मिटूर घोडबंदर , धारावी असे किल्ले हि पाहून झाले ...वाढदिवशी रसाळगड केला तोही गाडी गावापर्यंत नेऊन पुढे अर्धा तास चढत ....पण कोकणातून खड्या चढाईने घाटावर नेणाऱ्या , भर दिवसा घट्ट काळोख पसरवणारी जंगलं उराशी बाळगलेल्या , एखादी नथ जशी सौंदर्य वाढवते तसंच सुंदर कलाकुसर असलेल्या लेण्या मिरवणाऱ्या , अनेक औषधी वनस्पती आणि नानाविध प्राणीपक्षी आपल्या उरात दडवलेल्या आणि मायबाप सह्याद्रीचे अजस्त्र महाकाय कातळकडे आपल्या खांद्यावर तोलून धरलेल्या अशा घाटवाटा सतत साद घालत होत्या . .... दऱ्या घाट , नाणेघाट, सवाष्णी घाट
, बैल आणि शिडी घाट , बोचेघोळ , सिंगापूर , बोराटा , गोप्या घाट , मढे घाट , शेवते घाट , वाजंत्री घाट , गणेश घाट या आणि इतर घाटवाटा स्वप्नात येऊन पिंगा घालायला लागल्या होत्या .... तीन विकेंड सतत प्लॅन बनत होते आणि पावसामुळे फिस्कटत होते .... तीनही आठवडे मी घरातच मनाच्या 70mm वर हिरवागार निसर्ग , घनदाट जंगल , जंगलाचा तो एक हवाहवासा वाटणारा आणि भूल पाडणारा चमत्कारिक सुगंध , कोकणात कोसळणारे सरळसोट उभे कडे , भन्नाट वारा , डोंगरात जरा कुठे गॅप मिळाली कि सरसावणारे घाटाची ओढ लागलेले ढग , क्षणात हाडापर्यंत ओलाचिंब भिजवणारा मुसळधार पाऊस तर क्षणात चकचकीत सूर्यप्रकाश , काळ्याकुट्ट फत्तरात घडवलेली आणि पर्जन्य सरींनी लक्ख धुऊन निघालेली प्राचीन देवालयं आणि त्यात स्वतःच घडवलेला हा चमत्कार बघत ऐटीत बसलेल्या देवदेवता , वाऱ्यावर लेफ्ट राईट लेफ्ट संचालन करणारे गवताचे तुरे .. हे सगळं सगळं मनातच बघत मुठीवर मूठ आपटून दात खात बसलो होतो .
पावसाने थोडं आटोपतं घेतलं आणि माझ्या मनातली ठिकाणं मी मी करत नाचायला लागली , बऱ्याच घाटवाटा आणि किल्ले कशीबशी समजूत काढून आणि पुढच्या वेळी तुझी भेट नक्की अशी समजूत काढून बाजूला सारायला सुरवात झाली . पण सगळ्यात अशक्य भाग असतो तो हाच . सैरभैर होऊन प्रचंड कल्लोळ माजतो राव मनात . नाही म्हणजे नाही निवडता येत . सगळीच ठिकाणं हवीहवीशी वाटणारी आणि ओढ लावणारी असतात . मग त्यातल्या त्यात मुख्य ठिकाणच्या आजूबाजूला बघण्यासारखं अजून काही आहे का हे बघायला सुरवात होते . मग एक घाट, एखादा किल्ला , एखादं लेणं , सुंदर देवालय , प्राचीन वाडा असं कॉम्बिनेशन शोधायला सुरवात होते .
त्यातही पुढचा प्रश्न असतो सर्व मोहीम वीरांच्या तारखा आणि सगळ्यांना यायला सोयीस्कर पडेल असं ठिकाण ...
आणि ..
आणि .... क्षणात माझ्या समोर आला सुधागड परिसर ... सुधागड , तैलबैला , कोरीगड , तुंग , घनगड हे किल्ले .... घोणदांड , नाणदांड , नळी ची वाट आणि सवाष्णी घाट या घाटवाटा ... आणि ठाणाळे व खडसांबळे च्या बौद्धकालीन लेण्या ....बास .. ठरलंच ... यातलीच काही ठिकाणं नक्की केली गेली .
शनिवारी सकाळी निघून लोणावळा ते घनगड पर्यंत असलेल्यांपैकी कोणताही एक किल्ला करून केवणे पठारावर मुक्काम आणि रविवारी घोणदांड घाटाने अक्खा सह्याद्री उतरून खडसांबळे लेणी बघून नाणदांड घाटाने किंवा नळीने परत घाटावर .
u
मुहूर्त काढून स्थान निश्चिती केल्या केल्या .... आवाहनर्थम समर्पयामि करत व्हाटसपी एक कोंडाळं केलं गेलं .... लागलीच एक एक करत सर्व वतनदार आपलाआपल्या वतनातून पाय आपटत हजर ... मीरारोड, बदलापूर , वांगणी , ठाणे , वाशी आणि बेलापूर .... सर्व ठिकाणाहून दिंड्या ट्रेक वारीत टाळ कुटायला सज्ज झाल्या ....
कोणीही काहीच ठाम सांगायला तयार नाही .... ते प्रत्येक ग्रुप मध्ये असतंच कि तसं .. परंपरा , अनुशासन , आढेवेढे वगरे वगरे .... मह्या मी अन अश्विनी नक्की होतो ... ठरलं तर मग कोण येवो अथवा न येवो तिघांनी निघायचं ...तसं तर माझी एकट्याने जायची हि तयारी आधीच केली होती मी .... पण हो नाही करत 11 जण जमा झालेच ....समर्थांनी बसवलेल्या अकरा हनुमानांना साष्टांग दंडवत घालत आम्ही 11 भटके सज्ज झालो ....एक आठ जणांची तुकडी सकाळी लोणावळा परिसरात एखादा किल्ला करून मुक्कामास एकोलेत जाणार ..तर शनिवार चा अर्धा दिवस बॉस वर ओवाळललेले रात्री एकोलेत मुक्कामाला येणार .... आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सगळे मिळून आख्खा सह्याद्री उतरत खडसांबळे लेणी बघून परत अक्खा सह्याद्री चढत वर येणार ....
ठरल्या प्रमाणे मी अन अश्विनी ने दोन ब्यागा , स्टोव्ह , भांडी कुंडी आणि संपूर्ण शिधा एवढं सगळं सामान घोड्यावर लादलं आणि पहाटे 5.30 ला मीरारोड सोडलं .... घोडा ठाण्यात बांधला आणि आम्ही तेजस च्या पालखीत स्वार झालो .. वाह वाह फुल्ली आटूमाटिक पालखी ... लैच आराम ... त्याच वेळी बेलापूरातून सरदार मंदार घोडेकर निघाल्याची तोफ दणाणली " अरे मी निघालो आणि तुम्ही अजून तिथेच " ... लागलीच घोडेकरांवर बदलापूरातून छोटे सरदार रुद्रांश राव आणि वांगणीतुन येणारे महाबली महेशराव तरे यांना पालखी सह खोपोली स्थानकात सामोरे जाण्याची मोहीम सोपवली आणि काही काळ का होईना पण तोफ शांत केली . खोपोलीत पोचलो नाही तोच मह्या च्या खांद्यावरून तोफ पुन्हा एकदा लोणावळ्यातून कडाडली ... तोफेस प्रचंड भूक लागली होती .. तरी बुवा च्या मिसळीस जाणाऱ्या फाट्यास तोफेस थोडा विसावा घेण्यास सांगितले होते .. पण नाहीच ... कसाबसा गोंधळ घालत एकदाचे बुवाच्या मिसळीस पायउतार झालो आणि झणझणीत मिसळी वर तुटून पडलो .... तिखट खाण्यात तोफेचा हात कोणी धरून दाखवावाच .. हिरव्या मिरच्या हि तोफेस लाजून लाल होतात ..आणि मग सकाळी आग ओकण्यास तोफ सज्ज .. ह्या ह्या ह्या ... असो
तर बुवाच्या मिसळी चा यथेच्छ आस्वाद घेऊन दोन्ही पालख्या लोणावळ्यातून अँबी व्हॅली च्या रस्त्याने मार्गस्थ झाल्या .... सिद्धेश्वरा नंतर जलवायू मार्गासाठी उजवीकडे वळलो ..आणि सुरु झाला निसर्गाचा मंत्रमुग्ध करणारा पहिला अंक .... डोळ्यांना कमालीचा थंडावा देणारा चहूबाजूस पसरलेला हिरवा रंग , त्यातून मधेच जरतारीची नक्षी केल्या सारखे खळाळत वाहणारे धबधबे .... फ्रिजर उघडल्यावर कशी थंडगार वाफ अंगावर येते अगदी तसंच क्षणोक्षणी जाणवत होतं .. मन तर कधीच केलं होतं पण आता शरीरही त्या अद्भुत अगम्य अनाकलनीय तपस्वी सह्याद्री च्या स्वाधीन करून टाकलं .... टायगर व्हॅली ते आंबवणे तर 10 फुटावरचं दिसेना एवढं धुकं पसरलेलं ... हळूहळू करत अँबी व्हॅली च्या फाट्या पर्यंत पोचलो आणि उजवीकडे सालतर च्या खिंडीकडे वळलो .. तर तेवढ्यात समजलं ..सालतर च्या खिंडीत दरड कोसळली आहे म्हंणे .... ते ऐकून माझ्याही छातीत दरड कोसळली ... घरी जाऊन गुगल मॅप वर घोणदांड घाट बघत मी धाय मोकलून रडतो आहे अशी दृश्य हि डोळ्यासमोरून सरकून गेली .... खड्डयात गेलं भेंडी .. चालत जाऊ .. पण आता जायचंच ... भाषा पण बदलली बघा .. पण त्या कृपाळू विधात्यास क्षणभर माझ्या साडेसाती चा विसर पडला आणि तो आमच्या मदतीस धावून आला ...एक दुसरी वाट सालतर च्या अलीकडून वळसा घेत भांबुर्ड्यास जात होती ... खुललेल्या कळीवर अलगत पाणी शिंपडून गालातल्या गालात हसत मी लेफ्ट टर्न घेतला आणि सुरु झाला निसर्गाचा चमत्कारिक दुसरा अंक ..झाडांच्या नैसर्गिक बोगद्यातून पालख्या पुढे पुढे सरकत होत्या आणि अचानक एका वळणावर अगदी संमोहित झाल्या सारख्या करकचून थांबल्या ... काळ्या कुट्ट जंगलातून फेसाळत वाहणारा ओढा अक्षरशः जादू केल्या सारखं स्वतः जवळ आकर्षित करत होता ..ते चकचकीत पाणी , यक्ष , परी , शाप .. वरदान अगदी तसं वाटत होतं सगळं . तिथे काहीवेळ फोटोगिरी केली आणि पुढे निघालो ...
एकोले गावात गेल्या गेल्या पहिले मुक्कामाची सोय बघितली आणि लागलीच घनगड चढाईला सुरवात केली ... पहिलाच टप्पा सटासट चढत गारजाई पाशी येऊन थांबलो आणि आई ला मनोमन साकडं घातलं .."सगळ्यांना सुखरूप परत आण गं आई "
.... तिथूनच थोडं वर जाऊन प्रवेशद्वारा जवळ गुहेत पोटोबा करून शिडी वरून एकेकाला अलगद पुढे सरकवत बालेकिल्ला गाठला . निसर्गाचा जीव गोठवणारा तिसरा अंक सुरु झाला होता .. एवढ्या प्रचंड वेगाचा वारा मी उभ्या आयुष्यात आणि जे काही दोन अडीचशे ट्रेक केलेत त्यात कधीच अनुभवला नव्हता .. अगदी हरिश्चंद्राच्या कोकण कड्यावरही नाही कि रायगडाच्या टकामकावरही नाही ...
जागेवर उभं राहणं शक्य होत नव्हतं म्हणून थोडावेळ बसून घ्यावं लागलं .... हात शरीरापासून लांब केले कि पंखात हवा भरावी आणि वाऱ्याने मागे धावडवलाच समजा . जास्त वेळ नं घालवता गड सोडला आणि शिडी उतरून गरजाईला हात जोडून परत ऐकोलेत मुक्कामी आलो.
नेहमीप्रमाणे जो काही न काही विसरण्याचा शिरस्ता असतो त्या प्रमाणेच रॉकेल हि विसरलो आणि वाटेत डिझेल हि घेतलं नाही ..झालं आता या पावसात लाकडं पण फिदी फिदी हसतील आपल्याला .... चला भीक मागायची वेळ आली आहे ....
" मंदिराच्या पायरीवर बुटं काढू नका रे " असं दरडावणाऱ्या सत्तू दिघें कडेच हात पसरले आणि दिघे साहेब तात्काळ मदतीस तयार झाले . रात्रीचा भात त्यांच्या कडेच चुलीवर फुगवला आणि कराकरा पापडं खात मिटक्या मारत खाता खाता बदलापूर वरून तीन जणांची दुसरी टोळी हजर झाली . त्यात कळलं रस्त्यावर पडलेल्या पानांवरुन बाईक घसरून निखिल ने लोटांगण घातलं होतं ... ओइन्टमेन्ट चा विषारी वास आणि घोरण्याच्या चित्कारांत निद्रादेवी ने बाण सोडला आणि सगळी शरीरं क्षणात निपचित पडली .
रविवार सकाळ उजाडली 6 वाजता ट्रेक सुरु करायचा होता आणि पब्लिक उठलं साडे सहा ला .. रात्रीचा भात पोटात शिरून तर कोणी खाल्ला नाही ना एवढी कडक भूक लागली होती .. पोटातून कावळे पण काव काव ऐवजी सत्तू दिघे सत्तू दिघे करत भिका मागत होते . चला परत सकाळी सकाळी दिघे साहेबांच्या घरात कापलेले कांदे , शेंगदाणे , भिजवलेले पोहे , आलं , बिस्किटं , बटाटी हे सगळं एकेका ताटात नजराणे पकडून सेवक उभे राहतात ना तशी आम्हा भिक्षुकांची टोळी चोरटं हसत दाखल झाली .... विसरण्याचा दुसरा अध्याय म्हणजे दूध पावडरही विसरलो होतो .... गावातूनच अश्विनीने कुठून तरी दूध हुडकून काढलं आणि आता खऱ्या अर्थाने आम्ही अख्या गावात भिकारी म्हणून प्रसिद्ध झालो... . नाही पण असं नव्हतं मुळीच .... अहो किती माया लावतात हि सह्याद्रीच्या अंगा खांद्यावरची लोक .... दिघे साहेब त्यांची बायको आणि त्यांची मुलगी यांचं प्रेम च असेल ज्याने पोहे आणि चहाचा बेत मस्त फक्कड जमला आणि आम्ही 10.45 ला डेबे मामा ना साथीला घेऊन ट्रेक सुरु केला .
आता सुरु झाला होता निसर्गाचा चौथा अंक .... दाट धुकं .. पक्षांचा मोहक कलकलाट .. भन्नाट वारा ..धुक्यातून मध्येच डोकं वर काढणारा घनगड ..
केव्हणे , घोणदांड आणि खडसांबळ्याची ओढ .. पावसाने धुवून काढलेला डोंगर दर्यांचा कोपरांकोपरा .... साधारण तासाभरात केव्हणे पठारावर दाखल झालो आणि घोणदांड सुरु झाल्या झाल्या रंगमंचावर नाणदांड घाटाचा सोलो परफॉर्मन्स बघून थक्क झालो .... नजर जाईल तिथपर्यंत धबधबे जीव खाऊन कोकणात कोसळत होते ... भन्नाट वातावरण आणि मंत्रमुग्ध करणारा नजारा याच्या साथीनेच साधारण पाच तासात लेण्यांमध्ये पोचलो .. खाऊ वर ताव मारला आणि परतीच्या वाटेला लागलो ...
परतीची वाट होती नळी ची वाट ... दोन कडे एकमेकांना जिथे भेटतात तिथे खडा चढ असलेली आणि काही वेळेस ओढा वाहत असला तर दगडादगडांचा खडा चढ असलेली हि अशी नळी ची वाट खरोखर आपल्यातली रग जिरवून आपली ताकद पारखणारी असते .. पण अंधार पडेल आणी आपल्या कडे टॉर्च नाही या भीतीने सगळ्यांनी ताकद पणाला लावून अवघ्या 2 तासात केव्हणे पठार गाठलं आणि सुधागडाचं दर्शन घेत जीव भांड्यात टाकला .. तरीही शेवटचा केव्हणे ते एकोले हा टप्पा मोबाईल फोन च्या टॉर्च वर च पार केला आणि लोणावळ्यात कोंबडी वर ताव मारत पहाटे 4 वाजता घरी दाखल झालो ......
कळावे लोभ असावा :)









Comments
Post a Comment