मुल्हेरच्या पायथ्याला.... मोहरीचा (राई ) चहा ...
घ्या हा मोहरी चा फक्कड चहा
एक किस्सा ....गेल्या वर्षी एक मोहीम आखली गेली , आणि ती म्हणजे महाराष्ट्रातला सर्वात उंच किल्ला " साल्हेर " पादाक्रांत करण्याची....आणि मग सुरु झाली मोहीमवीरांना जमवण्याची खूपच जोखमीची आणि अतिशय क्लिष्ट मोहीम. २५....२०....१७ ....१२....८... असं करता करता जेमतेम मी धरून ५ वीर शड्डू ठोकून तयार झाले. ( मी ,प्रसाद दानवे ,प्रदीप दानवे ,मंदार घोडेकर आणि तेजस घाडगे ). कल्याण वरून रात्री १२ वाजता सुरु झालेला प्रवास चालक बदलत बदलत सुमारे ३५० किमी नंतर सकाळी ६ वाजता गडाच्या पायथ्याशी संपला ....त्या दिवसभरात किल्ला बघून वगैरे झाला आणि ५ जणांची टोळी मुक्कामाला मुल्हेर गावात येउन पोचली ,तसं पाहिलं तर मुक्कामाचा बेत मुल्हेर माची वरचा होता पण साल्हेरनेच पुरती दमछाक केल्याने काही मंडळींनी स्पष्ट नकार दिला ,तर असो ...मुल्हेर मधील एका आश्रमात राहण्याची सोय झाली ...आणि प्रसाद रावांची जेवण बनवण्यासाठी एकच लगबग सुरु झाली, मस्त खानदेशी खिचडी चा बेत झाला आणि पोटावर हात फिरवत आणि अन्नदाता प्रसाद सुखी भव म्हणत टोळके निद्रादेवीच्या अधीन झाले ....सकाळी उठल्यावर समजले मी आणि तेजस खूप घोरत होतो म्हणे ( घोरलो तर घोरलो आपल्याला काय बाकीच्यांच्या झोपेचे बारा वाजउन आम्ही फ्रेश )....तर सकाळी सकाळी आचाऱ्या ची परत लगबग सुरु झाली "चहा बनवण्याची"
....मग ह्याच्या त्याच्या सामानातून चहा पावडर ,साखर वगैरे शिधा जमवण्यास सुरवात झाली .....स्टोव जाळण्याचे काम खुद्द काकाश्री उर्फ प्रदीप दानवे करत होते...... जणू अन्नदात्या(प्रसाद ) बरोबर साक्षात अग्नीदेव आम्हा नतद्रष्टांच्या सेवेत सकाळी सकाळी रुजू झाले होते( अग्नीदेवाला रॉकेल अस्त्र उपलब्ध न झाल्याने त्याचा डीझेल अस्त्रावर थयथयाट सुरु होता हि गोष्ट निराळी ) .....मस्त पैकी स्टोव भडकला ,भांडे ठेवले गेले पाणी टाकले गेले सर्व सोपस्कर अथ ते इति पार पडले ....तेवढ्यात.
अन्नदाता :- अरे हर्षा चहाला कलरच येत नाही रे .....
अग्निदेव :- अरे हलव न जरा ...काय घाई आहे रे .....
मी :- गुलाल टाक थोडा, येईल कलर ....( अन्नदात्या चा एक भेदक द्रुष्टीक्षेप ....नशीब एक सणसणीत पुणेरी शाप नाही दिला )
थोड्या वेळाने परत ....
अन्नदाता :- अरे खरंच नाही येत कलर ....
अग्निदेव :- अरे हा काय आलाय ..( अन्नदात्या चा अग्नीदेवाला प्रचंड भेदक द्रुष्टीक्षेप )( इथे वडील आणि मुलगा या नात्याने फक्त वन वे शाप असतो त्यामुळे अन्नदाता मुग गिळून मुकाट बसला )
मंदार :- रात्री वरच झोपलो असतो तर बरं झालं असतं....( विषय काय चालू आणि ह्याचं काय , सगळ्यांचा मंदारला कुत्सित द्रुष्टीक्षेप पण इथेही शाप नाहीच , कारण चहाला रंग न येणे हे तोपर्यंत राष्ट्रीय संकट बनलं होतं )
सगळं टोळकं एव्हाना प्रेस वाले सेलीब्रीटिनच्या भोवती कोंडाळ करतात त्याप्रमाणे स्टोव भोवती गोळा झालं.....
आणि इतका वेळ सगळ्यांनी आवरून ठेवलेल्या शापरुपी भावना ....काकाश्री खुद्द हजर आहेत हे भान विसरून माझ्या तोंडून बाहेर पडल्या
""""""""""अरे पश्या च.... लेका चहा पावडर च्या जागी मोहरी टाकली रे तू ............"""""""""""""""
आणि कहर म्हणजे त्यात फक्त चहा पावडर टाकून उकळवून तो चहा टोळक्याने मिटक्या मारत प्यायला......
असा हा मोहरीचा चहा आमचा टोळकं कधीच विसरणार नाही यात वाद नाही .....
चूक भूल द्यावी घावी .....

Comments
Post a Comment